आपण सगळे रोज अनेक वेळा काही तरी खातोच. दिवसातून निदान दोन ते तीन वेळा तरी नक्कीच. समजा आपण दिवसभरात काही खाल्लेच नाही, तर काय होईल?
तुम्ही कधी उपास केला आहे का? जर केला असेल तर एक संपूर्ण दिवस काहीही खाल्लं नाही तर कसे वाटले होते त्याचे वर्णन करा. (1)
तुम्हाला अनेक दिवस उपाशी राहावे लागले तर कसे वाटेल याची कल्पना करा. (2)
योग्य आणि पुरेसे अन्न पोटात गेले नाही, तर माणूस दुबळा, अशक्त होतो. त्याचे वजन घटते. त्याच्यात काम करायची ताकद राहत नाही आणि तो आजारी पड्ण्याची बरीच शक्यता असते.
माणसांच्या जेवणातली विविधता थक्क करणारी आहे. काही लोक दाल-रोटी खातात, तर काहीना भात लागतो. काहीना मांस-मच्छी आवडते तर काहींना भाज्या आवडतात. काहीजण रोज दूध पितात, तर काहीना भरपूर फळं खायला आवडते.
आपले अन्न कशाचे बनलेले असते?
सगळे अन्नपदार्थ ज्या घटकांनी बनलेले असतात त्यांना पोषकद्रव्ये (nutrients) म्हणतात. आपला आहार कशाही प्रकारचा असो, आपले अन्न तीन मुख्य पोषकद्रव्यांनी बनलेले असते: स्निग्ध पदार्थ (fats), प्रथिने (proteins) आणि पिष्टमय पदार्थ (starch or carbohydrates). यांच्या शिवाय आपल्या शरीराला पाणी, मीठ, जीवनसत्वे, साखर अशा इतर पदार्थांचीही गरज असते.
एखादया अन्नपदार्थात कुठले घटक आहेत हे शोधून काढणे सोपे आहे आणि आपण वरील तीन मुख्य घटकांच्या चाचण्या करायला शिकणार आहोत. खनिज, व्हिटॅमिन्स आणि साखर हे पदार्थही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत परंतु त्यांच्या चाचण्या आत्ता करणे आपल्याला शक्य नाही.
तुमच्या वहीत तक्ता क्र. 1 उतरवून घ्या आणि त्यात तुमच्या निरीक्षणांची नोंद करा. (3)
तक्ता क्र. 1 |
||||
क्र. |
पदार्थ |
स्निग्ध पदार्थ (आहे/नाही) |
प्रथिन
|
पिष्टमय पदार्थ (आहे/नाही) |
1. |
शिजलेला भात |
|
|
|
2. |
भाताची पेज |
|
|
|
3. |
तांदूळ |
|
|
|
4. |
गहू |
|
|
|
5. |
कणीक |
|
|
|
6. |
बटाट्याचा काप |
|
|
|
7. |
शेंगदाणे |
|
|
|
8. |
अख्खी तूर डाळ |
|
|
|
9. |
भरडलेली तूर डाळ |
|
|
|
10. |
तूप |
|
|
|
11. |
दूध |
|
|
|
12. |
एखाद्या भाजीचा काप |
|
|
|
13. |
एखाद्या फळाची फोड |
|
|
|
प्रयोग क्र. 1
स्निग्ध पदार्थांची चाचणी
ज्या पदार्थांची चाचणी करायची आहे तो घेऊन एका कागदाच्या तुकडयावर हलकेच घासा. थोडा वेळ हा कागदी तुकडा हवेत वाळू द्या. जर हा कागद तुकतुकीत आणि अर्धपारदर्शक झाला असेल, तर तुमच्या अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ आहे.
केरोसीन, डीझेल आणि मेण या वस्तूंमुळे सुध्दा कागद अर्धपारदर्शक होतो पण हे अन्नपदार्थ नाहीत. त्यांच्यामध्ये स्निग्ध पदार्थ नसतात.
प्रयोग क्र. 2
प्रथिनांची चाचणी
ज्या पदार्थाची चाचणी करायची आहे, तो जर द्रव असेल, तर त्याचे 10 थेंब एका परीक्षानळीत घ्या. जर पदार्थ स्थायू असेल, तर त्याची थोडी पूड करुन ती परीक्षानळीत घ्या आणि तिच्यात 10 थेंब पाणी घालून नीट हलवा.
आता या द्रावात मोरचुदाच्या 2 टक्के द्रावाचे 2 थेंब आणि कॉस्टिक सोडयाच्या 10 टक्के द्रावाचे 10 थेंब घालून पुन्हा नीट ढवळा. जर या मिश्रणाचा रंग जांभळा झाला, तर त्यात प्रथिने आहेत.
प्रयोग क्र. 3
पिष्टमय पदार्थांची चाचणी
ज्या पदार्थाची चाचणी करायची, त्यावर विरळ (dilute) आयोडीन द्रावाचे 2‐3 थेंब टाका. जर पदार्थ काळा किंवा जर्द निळा झाला, तर त्यात पिष्टमय पदार्थ आहे.
आयोडीन द्राव शाळेतून सहज मिळाला नाही तर त्या ऐवजी कुठल्याही दवाखान्यात किंवा इस्पितळात मिळणारे टिंक्चर आयोडीन वापरूनही हा द्राव बनवता येतो. डॉक्टर्स याचा वापर जखमा निर्जंतुक करण्यासाठी करतात.
टिंक्चर आयोडीनचे 10 थेंब एका स्वच्छ परीक्षानळीत घ्या. नळी पाण्यानी अर्धी भरा. हाच तुमचा विरळ आयोडीनचा द्राव. याचा रंग हलका पिवळा असायला हवा.
आता वेगवेगळे अन्न पदार्थ घेऊन त्यांचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ तीनही घटकांसाठी चाचण्या करा.
ज्या पदार्थात जो घटक असेल, तिथे तक्त्यामध्ये योग्य त्या रकान्यात `आहे' असे लिहा. व नसेल, तर `नाही' असे लिहा. (4)
सगळ्या अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ आढळले का? (5)
अन्नपदार्थांमध्ये बहुतेक वेळा एका पेक्षा जास्त पोषक घटक असतात, असे म्हणणे बरोबर होईल का? (6)
गव्हाचे दाणे आणि गव्हाचे पीठ यांच्या आयोडीन बरोबरच्या अभिक्रियांमध्ये काही फरक दिसला का? असेल, तर काय फरक होता? (7)
अन्नाचे पचन
आपले शरीर सहसा अन्नपदार्थातून मिळणार्या कुठल्याच पोषक घटकाचा सरळ उपयोग करू शकत नाही. म्हणून, जे पदार्थ शरीर सरळ जसेच्या तसे वापरु शकते अशा पदार्थांमधे या पोषक घटकांचे रूपांतर करण्याची गरज असते. या क्रियेला पचन (digestion) म्हणतात.
पचनक्रिया ही शरीराच्या आंतरिक अवयवांमध्ये घडते. विच्छेदन केलेल्या उंदराच्या शरीरात हे अवयव कुठे आहेत हे तुमच्या शिक्षकांना दाखवायला सांगा.
या अवयवांमध्ये घडत असलेली पचनक्रिया तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार नाही, पण पिष्टमय पदार्थांचे पचन आपण तोंडात घास घेऊन चघळायला सुरुवात केल्या केल्याच सुरू होते म्हणून ती आपल्याला जाणवू शकते.
करून पाहा आणि विचार करा
थोडे कच्चे पोहे किंवा एक पोळीचा तुकडा तोंडात टाकून सावकाश चावा. थोडा वेळ चघळल्यावर त्याची चव बदलली का ? आता चव कशी आहे? चवीत बदल का बरं झाला असावा ?
या प्रश्नाचे उत्तर एक मस्त प्रयोग करून मिळू शकेल.
प्रयोग 4
पचनाची पहिली पायरी
एक चंचुपात्र पाण्याने एक चतुर्थांश भरा. त्यात अर्धा चमचा गव्हाचे पीठ टाकून हे मिश्रण हलवून एकजीव करा. मिश्रणाचे 10-12 थेंब एका परीक्षानळीत घ्या.
नळीत 2 थेंब विरळ आयोडीन द्राव घालून रंग काळा/निळा होतो का हे बघा.
दोन स्वच्छ परीक्षानळयांवर कागदी बिल्ले चिकटवून त्यांना A आणि B अशी नावे द्या.
प्रत्येक नळीत पिठाच्या मिश्रणाचे 25 थेंब घ्या.
आकृती क्र. 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे A परीक्षानळी तोंडापाशी आणून तिच्यात थोडीशी लाळ टाका. जितके पिठाचे मिश्रण असेल, साधारण तितकीच लाळ असायला हवी. नळी हलवून मिसळा.
B नळीत लाळ घालू नका.
दोन्ही नळया अर्धा तास तशाच ठेवून मग प्रत्येकीत विरळ आयोडीन द्रावाचे 2-2 थेंब टाका.
तक्ता क्र. 2 |
|||
परीक्षानळी |
लाळ घातली की नाही |
काळा/निळा रंग आला की नाही |
पिष्टमय पदर्थ आहे की नाही |
A |
घातली |
|
|
B |
घातली नाही |
|
|
तक्ता क्र. 2 स्वतःच्या वहीत उतरवून घ्या व तुमची निरीक्षणे त्यात मांडा. (8)
पिष्टमय पदार्थांवर लाळेचा काय परिणाम झाला ते सांगा. (9)
लाळेचा पिठावर झालेला परिणाम ही पचनक्रियेतली पहिली पायरी आहे. आपल्याला अन्न चावून चावून खायला का सांगितले जाते ? (10)
तोंडात चघळलेले अन्न एका नळीतून छातीवाटे जठरापर्यंत पोचते. जठर एका पिशवी सारखे असते आणि त्यातून पुढे एक लांब नळी जाते. या नळीला आतडे म्हणतात. लाळेने न पचलेले पिष्टमय पदार्थ, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचे पचन जठर आणि आतडे यांमध्ये होते.
ही इंद्रिये शरीरात कुठे असतात ? ती कशी दिसतात ? शिक्षकांच्या मदतीने विच्छेदित उंदरांच्या शरीरात ही इंद्रिये शोधा. शरीराने अन्न घेणे व त्याचे पचन करणे यालाच पोषण (nutrition) म्हणतात.
खिडकी असलेले जठर!
साधारण दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत जठरापर्यंत पोचलेल्या अन्नाचे पुढे काय होते याची वैज्ञानिकांना काही कल्पना नव्हती. त्यांना पचनाच्या क्रियेची माहिती नव्हती. जठरात बघून तिथे काय होते हे समजावून घेण्याचा कुठलाच मार्ग त्यांच्याकडे नव्हता. मग एक चमत्कारिक घटना घडली.
1822 मध्ये बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या मार्टिन नावाच्या शिपायाला डॉ. बोमन यांच्याकडे आणण्यात आले. साधारण दीड वर्षे डॉक्टरांनी ही जखम स्वच्छ करुन, मलमपट्टी करुन ती भरायला मदत केली. विचित्र गोष्ट अशी होती की जरी ही जखम पूर्ण भरली, तरी पोटाला पडलेले छिद्र मात्र बुजले नाही. ते छिद्र झाकणारा एक पातळ त्वचेचा जो पापुद्रा तयार झाला होता तो उचलून एक नळी जठरात घालून आत असलेले अन्न बाहेर काढणे शक्य झाले होते. हे करताना मार्टिनला कुठल्याही प्रकारची वेदना होत नसे आणि तो सशक्त होता.
डॉ. बोमन यांनी मार्टिनचे असाधारण जठर वापरून पचनक्रियेचे गूढ उकलण्याचे पक्के केले. नऊ वर्षे त्यांनी या खिडकी असलेल्या जठरावर निरनिराळे प्रयोग करुन भरपूर नवीन माहिती गोळा केली.
डॉ. बोमन यांनी प्रथम या जठरांतून पाचक द्रव्य बाहेर काढून एका छोटया बाटलीत भरले, आणि नंतर त्यात थोडे अन्न घातले. काही तासांमध्ये पाचक द्रव्यातले अन्न पूर्णपणे विरघळल्याचे त्यांना दिसले. पचनक्रिया ही कुठल्याही प्रकारची जादू नाही हे त्यांच्या लक्षात आले.
डॉ. बोमननि असा निष्कर्ष काढला की जठरात असेलेले रस रासायनिक अभिक्रियेद्वारा अन्नाचे पचन करतात. अन्नपदार्थांवर हे रस जठरात जी अभिक्रिया करतात तीच जठराबाहेर एका बाटलीतही होऊ शकते असे त्यांनी दाखवून दिले.
पोषण: किती आणि काय प्रकारचे अन्न
सामान्य समज असा आहे, की एखाद्या व्यक्तीने नियमितपणे भरपेट खाल्ले तर योग्य पोषण होते. पण हा समज बरोबर नाही.
उदाहरणार्थ, एकाच प्रकारचे खूप अन्न खाल्याने शरीर सशक्त राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांची गरज पूर्ण होत नाही. विविध प्रकारचे अन्न खाणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ असावेत. असे जेवण जर नियमित घेतले, तरच शरीराच्या योग्य पोषणाची गरज पूर्ण होते. सर्व प्रकारचे घटक असलेल्या आहाराला संतुलित आहार (balanced diet) म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीला योग्य आहार मिळाला नाही किंवा आहारातून त्याला सर्व अन्नद्रव्ये मिळाली नाहीत तर ती व्यक्ती अशक्त बनते. ज्यावेळी शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही, तेव्हा त्याला कुपोषण (malnutrition) म्हटले जाते.
प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये कुपोषणाचा धोका जास्त असतो. आकृती क्र. 3 मध्ये मुडदूस झालेल्या मुलाचे चित्र दाखवले आहे. मुडदूस हा कुपोषणामुळे होणारा रोग आहे.
कधीकधी मुलाला भरपूर अन्न मिळते, परंतु त्यामध्ये पुरेसे प्रथिनाचे प्रमाण नसते. आकृती क्र. 4 मधील मूल प्रथिनांच्या कमतरतेने ग्रासलेले आहे.
तुम्ही कधी मुडदूस किंवा प्रथिनांच्या कमतरतेमुळे आजारी असलेले मूल पाहिले आहे का ? असेल, तर दररोज हे मूल काय आणि किती खाते ते शोधून काढा. (11)
या मुलाला पुरेसे अन्न का मिळत नसेल? वर्गात याबद्दल चर्चा करा. (12)
अशक्तपणामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो, तेव्हा तो अजूनही अशक्त होतो. कुपोषित मुले सतत आजारी पडतात. त्यांच्या आजारामुळे ती अधिकच कुपोषित होतात. अशा प्रकारे ती आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकतात. अशा मुलांना संतुलित आणि पुरेसा आहार देणे हा त्यांना मदत करण्याचा एकुलता एक उपाय आहे.
कुपोषित मुलांना महागडया औषधांची किंवा टॉनिक्सची गरज नसते. संतुलित आणि पुरेसा आहार हा कुपोषणावरचा एकमेव उपाय आहे. हा आहार औषधे आणि टॉनिक्स एवढा महाग नक्कीच नाही.
जर डाळ, भात, पोळी, हिरव्या भाज्या आणि थोडासा गूळ नियमित आणि पुरेशा प्रमाणात खाल्ले तर शरीराला लागणारे सर्व पोषण मुलांना मिळू शकते. या व्यतिरिक्त जर आपण शेंगा, टोमॅटो, गाजर, पेरु, काकडी, लिंबू, पिकलेली पपई, आवळे इत्यादी गोष्टी खाल्या तर शरीराच्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांच्या गरजाही पूर्ण होतात.
खालील पाककृती वापरुन बनवलेल्या पिठाचे पदार्थ नियमित खाल्ले तर कुठल्याही मुलाचे कुपोषण दूर करता येईल.
समप्रमाणात शेंगदाणे, गहू आणि चणे एकत्र करून बारीक दळावेत. हे पीठ थोडया तेलावर हलके भाजून त्यात थोडा गूळ मिसळावा.
जमेल तेव्हा मुलाला हे खायला द्यावे, अगदी मूल बरे झाल्यानंतरही.
उजळणीसाठी प्रश्नः
1. तक्ता क्र. 1 मध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे, तिच्या आधारे खालील वाक्ये बरोबर आहेत की चूक ते सांगा.
अ. शरीराच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी फक्त भातच खाल्ला तरी पुरेसे आहे.
ब. जर एखादी व्यक्ती तूप खातपीत असेल तर तिला इतर काहीही खाण्याची गरज नाही
क. संतुलित आहार अनेक प्रकारच्या अन्न पदार्थांनी बनतो.
2. आपण जेवताना अन्न चावून/चघळून खाण्याची काय गरज आहे ?
3. प्रयोग क्र. 4 मध्ये तुम्ही परीक्षानळी A मध्ये लाळ टाकलीत, पण B मध्ये नाही. B मध्ये पिठाचे मिश्रण का घालण्यात आले होते? तुमच्या वर्गमित्रांशी आणि शिक्षकांशी चर्चा करून स्वतःच्या शब्दात या प्रश्नांची उत्तरे लिहा.
नवीन शब्द
पोषण उर्जा स्निग्ध पदार्थ प्रथिने पिष्टमय पदार्थ
खनिज जीवनसत्वे पचनक्रिया कुपोषण मुडदूस
संतुलित आहार पोषक पदार्थ जठर
रासायनिक अभिक्रिया पाचक द्रव्य.