खाली दिलेली चित्रे पाहा. त्यात जे दाखवलेले आणि लिहिलेले आहे ते तुम्हाला नीट पाहता आणि वाचता येत आहे का?
तुमच्या साहित्य संचातील हातात धरायचे भिंग (hand lens) घ्या. दिलेल्या चित्रांकडे त्या भिंगातून पाहा. प्रतिमा स्पष्ट आणि केंद्रस्थानी दिसेपर्यंत भिंग वर खाली करून पाहा.
तुम्ही भिंगातून काय पाहिले? त्या चित्रात तुम्हाला काही चुका दिसल्या का?
चौकटीत काय लिहिले आहे?
आपण काही छोट्या गोष्टी भिंगातून पाहूया. प्रथम एक किडा पकडा (मुंगी, डास, ऊ, माशी किंवा कुठलाही किडा). त्या किड्याचे भिंगातून लक्षपूर्वक निरीक्षण करा.
भिंगातून पाहिल्यामुळे किड्याचे काही नवीन अवयव तुम्हाला दिसले का? तुम्हाला जे दिसले त्याचे चित्र काढा. भिंगातून आणखी काही किडे पाहा व त्यांचे देखील चित्र काढून ठेवा.
एक सुती दोरा घ्या. व त्याचे चित्र काढा. आता त्या दोर्याचे भिंगातून निरीक्षण करा
भिंगातून दोरा कसा दिसला त्याचे चित्र काढा.
अशाच पद्धतीने तुम्ही भिंगाच्या साहाय्याने वेगवेगळ्या गोष्टीचे निरीक्षण करू शकता. उदाहरणार्थ फाटलेल्या कागदाच्या कोपऱ्याचे, कापडाच्या तुकड्याचे , गवताच्या काडीचे किंवा चिरलेल्या भाजीच्या तुकड्याचे निरीक्षण करू शकता
एक कोडे: फरक शोधा
ही दोन चित्रे सारखी दिसतात पण ती सारखी नाहीत. भिंगातून बारकाईने त्या चित्रांचे निरीक्षण करा.
तुम्हाला दोन चित्रांमधला फरक ओळखता आला का?
स्वत:चे भिंग बनवा.
आतापर्यंत तुम्ही भिंगाच्या साहाय्याने छोट्या गोष्टी पाहिल्यात. कामातून गेलेल्या विजेच्या बल्बच्या साहाय्याने छोट्या गोष्टी आपण जास्त स्पष्टपणे पाहू शकतो. हे कसे ते आपण करून पाहूया.
कामातून गेलेला एक पारदर्शक काचेचा बल्ब घ्या. बल्ब जमिनीवर ठेवा. बल्ब फुटू नये म्हणून बल्ब जमिनीवर कापड किंवा वही ठेवा वा त्यावर बल्ब ठेवा व बल्बचा मागचा काळा भाग हळूच दगडाने फोडा. बल्ब फुटणार नाही याची काळजी घ्या.
बल्बचा मागचा भाग आता मोकळा झाला असेल. बल्बच्या आत तार गुंडाळलेली एक काचेची नळी तुम्हाला दिसेल. मागच्या बाजूने एक लोखंडाचा लांब खिळा किंवा लाकडाची काठी घालून ती नळी अलगद आतल्या आत फोडा.
बल्ब हलवून एका कागदावर बल्बच्या आतले नळीचे तुकडे काळजीपूर्वक जमा करा. हे गोळा केलेले काचेचे तुकडे व तार नीट कचऱ्याच्या पेटीत टाकून द्या.
आता तुमच्याकडे नुसता पोकळ बल्ब व त्याचे मागचे धातूचे तोंड राहिले असेल. आता हा बल्ब 1/3 पाण्याने भरा. झाले तुमचे बल्बपासून बनवलेले भिंग तयार!
बल्बच्या भिंगाचा उपयोग करून तुमच्या पुस्तकातील मजकूर पाहा.
पुस्तकातील अक्षरे मोठी दिसत आहेत का?
या बल्बच्या भिंगाच्या साहाय्याने या धड्याच्या सुरवातीची चित्रे व मजकूर पुन्हा एकदा पाहा.
आता तुम्हाला काय दिसते आहे?
नेहमीचे भिंग व बल्बचे भिग दोन्हींच्या साहाय्याने पान नं.1 वरील सायकलच्या चित्राचे नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा.
तुलना करा: भिगाने दिसणाऱ्या अक्षरापेक्षा बल्बच्या भिंगाने दिसणारे अक्षर मोठे दिसत आहे की लहान?
बल्बच्या भिंगाच्या साहाय्याने आणखी काही छोट्या छोट्या गोष्टींचे निरीक्षण करा. उदाहरणार्थ, साखरेचा वा मिठाचा एखादा दाणा, वेगवेगळ्या बिया, इत्यादी.
यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील त्या गोष्टींचे चित्र काढा
पाण्याच्या थेंबाचे भिंग
एक काचपट्टी घ्या किंवा कडेला धार नसलेला काचेचा तुकडा घ्या. ती काच व्यवस्थित साफ करा. त्या काचेमधून सुती धाग्याकडे पाहा. आता पाण्याचा एक थेंब हलकेच काचेवर टाका. हा थेंब टाकण्यासाठी एक आगपेटीतील काडी घ्या, ती पाण्यात बुडवा आणि हळूच एक थेंब काचेवर न पसरू देता टाका. तो पसरू लागला तर काचपट्टी तुमच्या तेल लावलेल्या केसांवरून काही वेळा फिरवा. तुमच्या डोक्याचे तेल काचपट्टीला लागेल. आता काचपट्टीवर पाण्याचा आणखी एक थेंब टाका. आता थेंब पसरणार नाही. या पाण्याच्या भिंगाने त्या सुती धाग्याकडे पाहा. हे भिंग काच आणि पाण्याचा थेंब या दोन्हीमुळे तयार झाले आहे.
आता या भिंगातून आधीच्या सुती दोर्याकडे पाहा.
सुती धागा जास्त जाड दिसतो आहे का? तुम्हाला तो जसा दिसला तसे त्याचे चित्र काढा
तुमचा स्वत:चा एक केस या पाण्याच्या थेंबाच्या भिगातून पाहा..
काचपट्टी साफ करा आणि पाण्याच्या थेंबा ऐवजी एक तेलाचा वा ग्लिसरीनचा थेंब टाका. या भिंगातून पुन्हा सुती धाग्याकडे आणि केसाकडे पाहा. त्यांचे निरीक्षण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की वस्तू सुस्पष्ट दिसण्यासाठी थेंबाला धक्का न लावता काच तुम्हाला वर खाली हलवून वस्तूपासून योग्य अंतरावर आणावी लागेल. मग वस्तू स्पष्ट दिसेल.
सूक्ष्मदर्शक
भिंगाच्या साहाय्याने कोणतीही गोष्ट स्पष्ट दिसण्यासाठी त्या गोष्टीपासून भिंगाचे अंतर नेमके असावे लागते. त्यासाठी भिंग दूर तरी घ्यावे लागते किंवा गोष्टीच्या जवळ तरी आणावे लागते. हे भिंग हलवण्याचे काम जास्त सुकर व्हावे म्हणून भिंग एका विशिष्ट साधनावर घट्ट बसवले जाते. या साधनाला (instrument) सूक्ष्मदर्शक (microscope) म्हणतात.
आगपेटीचा सूक्ष्मदर्शक
आपण आता आगपेटीचा सूक्ष्मदर्शक बनवूया. आपण तेल किंवा पाण्याचा थेंब यांचा भिंग म्हणून वापर करू. आगपेटी ही आपल्या सूक्ष्मदर्शकाचे अंग असेल. हा सूक्ष्मदर्शक बनवण्यासाठी खालील गोष्टी गोळा करा.
रिकामी आगपेटी टाचणी पांढरा कागद
एक ब्लेडचे अर्धे पाते एक अगरबत्ती
दोन रबर बॅन्ड गोंद
आगपेटीच्या झाकणाला पात्याने आकृती क्र.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे खिडकी कापा. झाकणाच्या आत पुढे मागे सरकतो तो आगपेटीच्या काड्या ठेवायचा भाग घ्या आणि आकृती क्र. 2 मध्ये `A' ने दर्शवलेल्या पृष्ठभागावर स्वच्छ पांढरा कागद चिकटवा. आता तो भाग आगपेटीच्या झाकणात बसवा. आगपेटीच्या झाकणाला केलेल्या खिडकीतून सरकणार्या भागाच्या खालच्या बाजू मध्ये टाचणी घाला. (आकृती क्र. .2)
या पुस्तकाच्या पाठीमागची दोन पाने पाहा. त्यातील एकावर एक जाड कागदाची पट्टी आहे जी तुम्ही या सूक्ष्मदर्शकासाठी वापरू शकता. ती जाड पट्टी कापून घ्या. या पट्टीच्या एका बाजूला एका काळ्या वर्तुळाच्या मधोमध एक गोल पांढरा ठिपका आहे. पेटलेल्या अगरबत्तीच्या साहाय्याने या पांढर्या गोलातील कागद जाळून काढा. आता पट्टीला त्या पांढर्या गोलाच्या जागी त्याच आकाराचे छोटेसे भोक असेल. ही पट्टी XY या खुणेच्या रेषेवर 90 अंशाच्या कोनात दुमडा.
ही पट्टी झाकणाच्या खालच्या बाजूला दोन रबर बॅन्डच्या साहाय्याने पक्की मांधून टाका. (आकृती क्र 3). काळ्या गोळ्याच्या भागावर तेल लावा. आता मध्यभागी असलेल्या भोकावर हाताने हलकेच पाण्याचा थेंब टाका. (आकृती क्र 4).
तुम्हाला सूक्ष्मदर्शकातून जे काही पाहायचे असेल ते काड्या ठेवायच्या भागातील पांढऱ्या कागदाच्या पट्टीवर ठेवा. पाण्याच्या थेंबाच्या भिगातून त्या वस्तूचे निरीक्षण करा. आगपेटीचा आतला भाग टाचणीच्या साहाय्याने मागे पुढे सरकवून तुम्ही गोष्ट स्पष्ट दिसेपर्यंत अंतर बदलू शकता.
पूर्ण सूर्यप्रकाशात या पेटीच्या सूक्ष्मदर्शकातून तुम्हाला चांगले स्पष्ट दिसेल.
साहित्य संचातील सूक्ष्मदर्शक
शिक्षकांच्या परवानगीने तुमच्या साहित्य संचातील (kit) सूक्ष्मदर्शक काढून घ्या (आकृती क्र. 5). शिक्षकांना त्याचे भाग सुटे करून तुम्हाला दाखवायला सांगा. हे भाग आकृती क्र. 6 मध्ये दाखवल्याप्रमाणे असतात.
या सूक्ष्मदर्शकाचे भिंग हे हे एक काचेच्या मण्याचे आहे. चित्रात सूक्ष्मदर्शकात ते भिंग कुठे बसवायचे ते दाखवले आहे.
हा काचेचा मणी म्हणजे या सूक्ष्मदर्शाकाचे सर्वस्व आहे, त्या मण्याची चांगली काळजी घ्या.
भिंग साफ करा, सूक्ष्मदर्शकात बसवा व त्यावर त्याची टोपी घाला.
तुमचा सूक्ष्मदर्शक कसा वापराल?
जी गोष्ट सूक्ष्मदर्शकातून पाहायची आहे ती वस्तू काचेच्या पट्टीवर (glass plate) ठेवा. पट्टी दोन चिमटयांमध्ये ठेवा. जी पाहायाची ती वस्तू भिंगाच्या बरोबर खाली आली आहे याची खात्री करून घ्या. एक डोळा बंद करा व दुसऱ्या डोळ्याने भिंगातून पाहा. वस्तू स्पष्ट दिसू लागेपर्यत बाजूला असलेल्या फिरकीने वस्तूपासून भिंगाचे अंतर कमीजास्त करा. सूक्ष्मद्रशकाचा आरसा उजेडाकडे करून वस्तू स्पष्ट दिसेपर्यंत फिरवा.
तुमच्या वर्गातील इतर मुलांच्या सोबत पाळीपाळीने सराव करा व सूक्ष्मदर्शक योग्य रीतीने हाताळायला शिका.
तुमचा सूक्ष्मदर्शक हे खूप नाजूक साधन आहे. त्याचा खूप काळजीपूर्वक वापरा करा.
तुमच्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तुम्ही तुमचा केस, छोटे किडे, फुलांच्या पाकळ्या तसेच साखरेचा दाणा, मुंगी इत्यादी पाहू शकता.
तुमचा केस किती जाडा दिसतो?
मुंगीचे वा छोट्या किड्याचे पाय कसे दिसतात?
काच पट्टीवर ठेवलेल्या वस्तूला स्पर्श न होता भिंग वापरले गेले पाहिजे. काचपट्टीवर ठेवलेल्या वस्तूला ते जर चुकीने लागले तर ते तुम्ही साफ कसे कराल?
साखरेचा दाणा सूक्ष्मदर्शकातून कसा दिसतो?
फुलाच्या पाकळ्यांत तुम्हाला काही नवीन वैशिष्ट्ये दिसली का?
या सूक्ष्मदर्शकात वस्तू 50 पटींनी मोठी दिसते.
शोध कार्य हाती घ्या
एखाद्या डबक्यातील किंवा तलावातील पाणी घ्या. या पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर टाका. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने या थेंबाचे निरीक्षण करा.
त्या पाण्याच्या थेंबात काय दिसत आहे?
विचार करण्यासाठी आणखी काही
आता तुम्हाला असे वाटत असेल कि भिंगातून पाहिल्यावर गोष्टी मोठ्याच दिसतात. पण हे खरे नाही. तुमच्या हातातल्या भिंगाने गोष्टी तुम्हाला लहान व उलट्या देखील दिसू शकतात.
यासाठी भिंगातून तुम्हाला खुप दूर असलेल्या वस्तूंकडे पाहायला हवे भिग तुमच्या पासून सुमारे दोन फुट अंतरावर धरा आणि दूरच्या वस्तूंकडे पाहा. या वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी तुम्हाला भिग पुढेमागे करावे लागेल.
पान नं. 4 वरील आगपेटीचा सूक्ष्मदर्शक हा श्री. जगदीश चंद्र श्रीवास्तव, शासकीय माध्यमिक शाळा न. 1 सांवर, जिल्हा इंदूर या शिक्षकांनी निर्माण केला आहे.
नवीन शब्द
हातातले भिंग भिंग सूक्ष्मदर्शक
साधन काचपट्टी साहित्य संच